कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात

खाजगी इसमाकरवी तीन हजारांची स्वीकारली लाच; 
कराड वार्ता न्युज
कराड/प्रतिनिधी : - कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यातील खाजगी इसमाकरवी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईत संबंधित खाजगी इसमाने स्वीकारलेली तीन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

भिमराव शंकर माळी (वय ३७) कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान रा. मलकापूर (ता. कराड) व मुस्तफा मोहिदिन मणियार (वय २५) देशी दारू दुकान मॅनेजर (खाजगी इसम) रा. लक्षीनगर, मलकापूर (ता. कराड) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क, सातारा विभागाच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कराड कार्यालयाचा जवान भिमराव माळी याने अवैध दारु विक्री केल्याबाबत तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये कारवाई केली होती. त्यानंतर माळी याने सदर दाखल गुन्हयामध्ये मदत करण्याकरिता व पुन्हा दारु विक्रीचा धंदा चालू करु देण्याकरिता स्वतःकरिता प्रथम तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. नंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल केले. तसेच लाचेच्या रकमेरील तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता खाजगी इसम मुस्तफा मणियार याच्याकडे देण्यास सांगितले.

याबाबत तक्रारदार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क सांगली विभागाचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोहेकों ऋषीकेश बडणीकर, पोना प्रितम चौगुले, पोशि सुदर्शन पाटील, चालक विठठल रजपुत यांनी सापळा रचून बुधवार (दि. ५) रोजी लाचेच्या रकमेरील तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचा समक्ष स्वीकारताना खाजगी इसम नामे मुस्तफा मोहिदिन मणियार रा. लक्षीनगर, मलकापूर (ता. कराड) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत खाजगी इसम मुस्तफा मणियार याच्याकडून स्वीकारलेली लाचेची तीन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी भिमराव माळी व मुस्तफा मणियार या दोन्ही आरोपींविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणी सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत तपास करीत आहेत.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क सांगली विभागाचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोहेकों ऋषीकेश बडणीकर, पोना प्रितम चौगुले, पोशि सुदर्शन पाटील, चालक विठ्ठल रजपुत यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली