स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम मिशन मोडवर राबवावा- पालकमंत्री शंभूराज देसाई न्युज कराड वार्ता

स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम मिशन मोडवर राबवावा
- पालकमंत्री शंभूराज देसाई  न्युज कराड वार्ता
सातारा दि.21: स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायती, नगर परिषदांनी मिशन मोडवर राबवावा. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणा, नगर पालिकांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद उपस्थित होते.
कराड आणि पाचगणी या नगरपालिकांना स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यात इतरत्र स्वच्छतेच्याबाबतीत आपण बरेच मागे आहोत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, अनेक ग्रामपंचायतीमधील बाजारपेठा व व्यवसाय बंद झाल्यावर रात्री पिशवीत भरुन कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकला जातो. हे चित्र जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. हे बदलण्यासाठी आणि एकूणच सातारा जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यात मिशनमोडवर राबविण्याबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी गट विकास अधिकारी व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या.
छोट्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वतंत्र राबविण्यास शक्य नसल्यास 20 ते 25 गावे यांना एकत्र आणून असे प्रकल्प उभे करावेत व ते चालवावेत. त्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन द्याव्यात. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अथवा नगर पालिकांमध्ये समाधानकारक काम होणार नाही अशा यंत्रणाच्या संबंधितावर कठोर करवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिले. यावेळी त्यांनी स्वच्छता, कचरा वर्गीकरण याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधींनी या कामासाठी पुढाकार घ्यावा. सरपंच, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळा घ्याव्यात. घनकचरा प्रकल्पांसाठी शासकीय जागांचा शोध घ्यावा. त्यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
एका महिन्यात स्वच्छतेच्या विषयामध्ये भरीव कामगिरी करावी त्यासाठी क्षेत्रीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भागामध्ये जावे. सातारा नगरपालिकेने  स्वच्छतेसाठी वॉर्डन नेमले आहेत, कचरा टाकणाऱ्यांचे ते चित्रीकरण करतात व संबंधिताला दाखवतात. त्यामुळे नागरिकांमध्ये  जाणीव निर्माण होते व कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांवर आळा बसतो, असे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवावे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत ज्या ग्रामपंचायती व नगरपालिकांचे घनकचरा प्रकल्प चांगले सुरु आहेत त्यांची माहिती घेऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी कौतुक केले. या बैठकीत पाचगणी नगरपालिकेप्रमाणे महाबळेश्वर येथेही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. पाचगणी नगरपालिकेने जे काम केले ते महाबळेश्वर नगर पालिकेनेही करणे आवश्यक होते, असे सांगून वारंवार सूचना देऊनही याबाबतीत कामाला गती येत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
0000


उमेद मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा दि.21 : जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आवारातील गाळ्यात उमेद मार्ट सुरु करण्यात आले आहे. या मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, मनोज राजे, संजय निकम, सुनिल सूळ, रंजनकुमार वायदंडे, सुरज पवार आणि सर्व तालुका अभियान व्यवस्थापक याप्रसंगी उपस्थित होते. 

उमेद मार्टमध्ये जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी बचत गटांनी उत्पादित दर्जेदार मालांची खरेदी करावी व बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
0000


तारळे प्रकल्पग्रस्तांचे शेरे पंधरा दिवसात उठवावेत
- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.21 : तारळे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे उठविण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शेरे उठविण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड,पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
तारळे प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्रात 20 गावे येतात. यातील 11 हजार 922 खातेधारकांच्या जमिनीवरील शेरे उठविले असून 4 हजार 951 खातेदारांच्या जमिनीवरील शेरे शिल्लक आहेत. हे शेरे येत्या 15 दिवसात उठवावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
0000



Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी