राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती: १०६२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

कृष्णा विश्व विद्यापीठाचा मंगळवारी १३ वा दीक्षांत सोहळा

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती: १०६२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

कराड, ता. २ : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत सोहळा मंगळवार दिनांक ३ जून रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार असून, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या सोहळ्याला आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील १०६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, की ग्रामीण भागातील जनतेला उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी सन १९८२ साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर १९८३ साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व १९८४ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. २००५ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. स्व. जयवंतराव भोसले आप्पांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे; तर परदेशातही कृष्णा विश्व विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे. कृष्णा विद्यापीठाला 'नॅक'चे 'ए प्लस' श्रेणीचे अव्वल मानांकन, तसेच 'आयएसओ' मानांकन प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाच्या यंदाच्या १३ व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (४५०), नर्सिंग (१५५), दंतविज्ञान (११८), फिजिओथेरपी (११५), सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी अधिविभाग (९३) आणि फार्मसी (१३१) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी, नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण १,०६२ विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान केली जाणार आहे. तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त २५ विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी दिली आहे.

सोबत फोटो : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी