आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या जुन्या कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर
जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी उभारला जाणार नवा चारपदरी पूल
कराड, ता. २ : कराड येथे ब्रिटीशांनी उभारलेल्या जुन्या कोयना पुलाला तब्बल १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. कराडला पुणे-बेंगलोर महामार्गाशी जोडण्याचे काम हा पूल दीर्घकाळापासून करतो. पण गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याने तो धोकादायक बनला आहे. सध्या तर हा पूल केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठीच खुला आहे. पण लवकरच हा पूल कात टाकणार आहे. कारण कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या जुन्या कोयना पुलाच्या जागी नवा चारपदरी पूल उभारण्यासाठी, केंद्र सरकारच्या सी.आर.आय.एफ. फंडांतर्गत ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश राजवटीत सन १८७१ च्या सुमारास जुन्या कोयना पुलाची उभारणी करण्यात आली. कराड शहराला विविध बाजूंनी जोडणारा दुवा म्हणून या पुलाची ओळख आहे. कराड परिसरातील सर्वांत पहिला लोखंडी व दगडी बांधकाम असणारा हा पूल कमानी स्वरूपाचा असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. नदी पात्रातील बांधकामदेखील दगडी असून, वरील सर्व भाग लोखंडी आहे.
या पुलाला तब्बल १५४ वर्षे पूर्ण झाली असून, हा पूल कुमकुवत झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मध्यंतरी या पुलाची जुजबी दुरुस्ती करण्यात आली, पण पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर मात्र होऊ शकलेला नाही. सध्या या पुलावरुन केवळ हलक्या वाहनांचीच वाहतूक सुरु आहे. त्यातही हा पूल अत्यंत अरुंद असल्याने या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी उद्भवते. तसेच महामार्गावरील पुलाचे काम सुरु असल्याने नव्या कोयना पुलावर आणि कोल्हापूर नाक्यावरही मोठी वाहतूक कोंडी होताना दिसून येते.
भविष्यातील वाहतुकीचा विचार करता कराडमध्ये येण्यासाठी जुन्या कोयना पुलाच्या जागी नवा पूल उभारण्याची गरज ओळखून, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केला. याप्रश्नी आ.डॉ. भोसले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करुन, या नव्या पुलाच्या उभारणीबाबतची वस्तुस्थिती सांगितली.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या या मागणीची दखल घेत, जुन्या कोयना पुलाच्या जागी नवीन चारपदरी पुलाची उभारणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (सी.आर.आय.एफ.) अंतर्गत तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या नव्या पुलाच्या उभारणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या भरघोस निधीबद्दल भाजपा-महायुती सरकारचे आणि आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कराडवासीयांमधून अभिनंदन केले जात आहे.
सोबत फोटो :
आ. डॉ. अतुलबाबा भोसले
Comments
Post a Comment