संस्कारांची शिदोरी' हा कथासंग्रह समाजाला नवी दिशा देणारा आहे*कराड वार्ता न्युज
*मा.संगीता साळुंखे* *कराड:- विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालयात नुकताच 'संस्काराची शिदोरी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या केवळ येथील माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे म्हणाल्या* *"शिवजयंतीच्या निमित्ताने प्रकाशित होणारे संस्काराची शिदोरी हे पुस्तक सुसंस्कृत समाज घडविण्याचा प्रयत्न करेल. या पुस्तकातल्या अनेक गोष्टी नव्याने आपल्यापुढे मांडून आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये असायलाच हवी हा संस्कार या पुस्तकांमध्ये आहे. या पुस्तकातील अनेक गोष्टी आपल्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या आहेत. एका पुस्तकाचे पारायण करण्यापेक्षा ग्रंथालयातील प्रत्येक पुस्तकाचे पारायण झाले पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर प्रचंड प्रगल्भता येते. पुस्तकाचे महत्व अनन्य साधारण आहे हे आपण सगळ्यांनी अधोरेखित केले पाहिजे. ग्रंथालयात लावलेल्या अनेक लेखकांचे, महापुरुषांचे फोटो पाहून त्यांच्या जीवनातील चांगल्या गुणांचा आपण अंगीकार केला, तर हजारो शिवराय या देशात जन्माला येतील. संस्काराची शिदोरी हे पुस्तक आपल्याला एक आदर्श नागरिक करून आपल्यामध्ये ज्ञान व संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करणारे आहे. म्हणून ते प्रत्येकाने वाचले पाहिजे. मला खात्री आहे, संस्काराची शिदोरी हा कथासंग्रह समाजाला नवी दिशा देणारा आहे*
*यावेळी बार्शी येथील प्रसिद्ध वक्ते व लेखक सत्यजित जानराव म्हणाले, "आज समाजात नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना, चंगळवादी संस्कृती फोफावत असताना, कुठेतरी संस्कारांचे किती महत्त्व आहे हे सांगण्याचे काम संस्कारांची शिदोरी या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने या पुस्तकातील ज्ञान घेऊन स्वतःपुरते न ठेवता ते समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संस्काराविना समाजाची विस्कटत चाललेली घडी बसविण्याचे काम भविष्यात हे पुस्तक नक्की करेल असा मला विश्वास वाटतो*
*याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य गणपतराव कणसे म्हणाले, "संस्कार बाजारात विकत मिळत नाहीत. ते मिळत असते तर अनेक श्रीमंत व्यक्तींनी ते बाजारातून विकत घेतले असते. पण ते संस्कार आपल्याला घर समाज व मित्रातून आणि संस्कारांची शिदोरी यासारख्या पुस्तकातून मिळतात. माणूस पैशाने कदाचित श्रीमंत होईल पण ज्ञानाची श्रीमंती मात्र त्याला पुस्तकातूनच भेटते. संस्कारांची श्रीमंती तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून ही श्रीमंती येण्यासाठी संस्कारांची शिदोरी हे पुस्तक आपण प्रत्येकाने वाचली पाहिजे*
*यावेळी स.गा.म. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रसिद्ध लेखक व वक्ते सत्यजित जानराव यांना ग्रंथालयाच्या वतीने मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्रंथालयाचे वाचक, संचालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दादाराम साळुंखे यांनी केले तर आभार सौ. कांचन धर्मे यांनी मानले*
Comments
Post a Comment