श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न

फोटो : जीवनधर चव्हाण,  हरीष पाटणे,  शरद महाजनी यांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मिलिंद भेडसगावकर, विठ्ठल हेंद्रे व इतर.

पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे : शरद महाजनी 

‘श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न

सातारा : पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता जपून पत्रकार क्षेत्रात काम केले. आता नव्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्याचे आणि जोपासण्याचे काम प्रिंट मीडियाला निर्धाराने करावे लागेल. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून वाटचाल करावी. विविध विषयांवर लेखन करताना सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखणी प्रसंगी कठोर व मृदूही झाली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी केले.

महाजनी परिवाराकडून देण्यात येणार्‍या श्रीराम जानकी स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे दै. ‘पुढारी’ सातारा कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, दै. ‘पुढारी’चे सातारा विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर,  सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, खजिनदार अमित वाघमारे, कार्यकारिणी सदस्य मीना शिंदे, रिजवान सय्यद, गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे उपस्थित होते.

शरद महाजनी म्हणाले, विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देत असताना पत्रकरिता क्षेत्रातही आदर्श पुरस्कार सुरु करुया असा विचार मनात आला. आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार देत असल्याचा आनंद आहे.
प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण झाले त्या कार्यक्रमात माझ्या वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. राजमाता सुमित्राराजे भोसले आणि शाहू महाराज यांच्या धार येथे झालेल्या विवाह समारंभासाठी आईवडिलांना खास निमंत्रित करण्यात आले होते. वडिल संस्कृत भाषेचे विद्वान होते. मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. आईने संस्काराची शिदोरी दिल्याचेही शरद महाजनी म्हणाले.

हरीष पाटणे म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांच्याकडून पत्रकारितेची शिकवण व संस्कार मिळाले. त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारांना ‘श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार’ पुरस्कार देण्याची त्यांची कल्पना अभिनव आहे. आमच्या पाठीशी त्यांच्या नैतिकतेचे अधिष्ठान लाभले आहे. त्यांचे आणि ‘पुढारी’ परिवाराचे ऋणानुबंध कायम आहेत. यापुढे पत्रकार दिनी या पुरस्काराचे वितरण केले जाईल. होतकरू पत्रकारांना संघटनात्मक पातळीवर संधी देण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला मिळालेला वसा, वारसा हा सहकार्‍यांनी पुढील पिढीला द्यावा. पत्रकारितेतील नव्या सहकार्‍यांना प्रोत्साहित करण्याचे काम यापुढे करत राहू, असे त्यांनी सांगितले.

आदेश खताळ म्हणाले, दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे तसेच ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांचे पत्रकारितेत काम करताना नेहमीच मार्गदर्शन लाभले. पत्रकारिता ही जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडताना समाजाच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं आहे.

पद्माकर सोळवंडे म्हणाले, “पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्टतेची ओळख मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे मला पुढील कामासाठी आणखी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले आहे. पत्रकारितेच्या प्रवासात वेळोवेळी येणाऱ्या अडचणींवर मात करत मी आपल्या जबाबदाऱ्या निभावत आलो आहे. समाजातील प्रश्न मांडण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग प्रभावीपणे कसा करता येईल याचा सातत्याने विचार केला पाहिजे. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर अधिक चांगले काम करण्यासाठीची प्रेरणा आहे.”

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना महाजनी परिवाराकडून देण्यात येणारा "श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार"  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन विठ्ठल हेंद्रे यांनी केले. आभार सागर गुजर यांनी मानले.फोटो : जीवनधर चव्हाण,  हरीष पाटणे,  शरद महाजनी यांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मिलिंद भेडसगावकर, विठ्ठल हेंद्रे व इतर.
फोटो : जीवनधर चव्हाण,  हरीष पाटणे,  शरद महाजनी यांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मिलिंद भेडसगावकर, विठ्ठल हेंद्रे व इतर.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त