इंटरनेट युगातही पोस्टाचे महत्त्व अनन्यसाधारण कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
दरवर्षी 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. टेलिफोन आणि मोबाईल अस्तित्वात येण्याच्या आधीपासून टपाल सेवा अस्तित्वात आहे. टपाल सेवेला मोठा इतिहास आहे.
राजे, राजघराणी, राजांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सामान्य नागरिक पत्रांद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायचे. आधी प्रत्येक गावात एक शिपाई असायचा. हा शिपाई पत्र घोड्यावर घेऊन पुढच्या गावातल्या शिपायाला द्यायचा. प्रत्येक शिपाई त्याच्याकडे आलेल्या पत्रातील जी पुढे पाठवायची ती वेगळ्या पिशवीत भरून पुढच्या गावाला द्यायचा आणि जी स्वतःच्या गावातील आहेत ती पत्र स्वतःकडे ठेवून नंतर संबंधित ठिकाणी जाऊन वाटप करायचा.
पुढे या व्यवस्थेत 15 ऑगस्ट 1972 पासून पिनकोड क्रमांकांचा समावेश झाला. श्रीराम वेलणकर यांना पिनकोड चे जनक मानले जाते. यामुळे पत्त्यांची अचूकता वाढली आणि टपाल सेवा अधिक प्रभावी रित्या कार्यरत झाली.
ब्रिटिश काळापासून म्हणजे 1 ऑक्टोबर 1854 पासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलेले आहे. आजच्या ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन् पोस्टमन काका आजही लोकांच्या मनात पाय रोवून उभे आहेत. टपाल खात्याची नियमितता, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्ह आहे, यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. पोस्टमन उन पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधं पत्र असो वा स्पीड पोस्ट वा रजिस्टर पार्सल असो पण प्रत्येकाच्या घरात प्रामाणिकपणे पोहोचवणारा हक्काचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे पोस्टमन असतो.
टपाल सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून देशाच्या कानाकोपऱ्यात संदेशाचे वहन करण्यात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्मार्ट मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान संदेश वहनाच्या काळात टपाल खात्याने महत्त्व टिकवून ठेवले आहे. टपाल विभागाने देखील आपल्या सेवेत अमूलाग्र बदल केला असून, कामाच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. टपाल सेवाही पूर्णपणे डिजिटल व ऑनलाईन झालेले आहेत. आजकाल पोस्टमन दादा हा चालती फिरकी बँक व एटीएम झालेला आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने डिजिटल युगातील पोस्टमन देखील डिजिटल झालेला आहे.
कोविड च्या काळात पोस्ट विभागाने देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता इंटरनेटचा जमाना आहे. त्यामुळे पत्र व्यवहार कमी झाला असला तरी आजही जगभरात वस्तू पाठवण्यासाठी टपाल सेवा काम करत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये अवघं जग ठप्प पडलं होतं तेव्हा अनेक गोष्टी जगभरात सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी टपाल विभाग काम करत होते. यामध्ये औषधांपासून ते अत्यावश्यक वस्तू पर्यंत पार्सल पोस्टाने नागरिकांना पर्यंत पोहचविले आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये 9 ऑक्टोबर 1874 रोजी 22 देशांनी एका करारावर स्वाक्षरी (सही) केली आणि युनिव्हर्सल पोस्टल युनियन स्थापन झाली. ही अधिकृत आंतरराष्ट्रीय टपाल सेवेची सुरुवात होती. करारात सहभागी झालेल्या देशांनी आंतरराष्ट्रीय पत्र व्यवहारासाठी विशिष्ट नियमांची चौकट निश्चित केली. यानंतर 1969 मध्ये जपानची राजधानी टोकियो येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची परिषद झाली. याच परिषदेत दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला.
घरात कोणाचा जन्म असो, मरण असो, नोकरीची ऑर्डर, बँकेची नोटीस अथवा कोर्टाची नोटीस, मनिऑर्डर असेल किंवा दिवाळी निमित्ताने मिळणारे आप्त स्वकीयांचे शुभेच्छा पत्र असो अश्या किती तरी आठवणी वर्षानुवर्षे सामान्य माणसाचे पोस्टाशी नाते घट्ट करते.
कराड डाक विभागात अधीक्षक दिलीप सर्जेराव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय टपाल सप्ताह सात ते अकरा नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येत असल्याची माहिती डाक अधिकारी विजय कदम व अमित देशमुख यांनी दिली.
Comments
Post a Comment