कराडच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंना साथ द्या : ना. देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व वाखाण रोड विकासकामाचे ई-भूमीपूजन उत्साहात
कराड, वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
: कराड शहराच्या आणि एकूणच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. अतुल भोसले घेत असलेले प्रयत्न विशेष लक्षवेधी आहेत. कराड दक्षिणमधील अनेक विकासकामांसाठी ते सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करतात. कराड दक्षिणमध्ये भरघोस विकासनिधी खेचून आणण्यासाठी डॉ. अतुलबाबा दाखवित असलेली तळमळ आणि करत असलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. येत्या काळात कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डॉ. अतुल भोसले यांना साथ द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महायुती सरकारच्या माध्यमातून आणि डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या एकूण १४६.५० कोटींच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे नुतनीकरण व वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्याच्या विकासकामाच्या ई-भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. लवकरच स्टेडियमच्या विकासकामाला प्रारंभ होऊन, कराडकरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी सुसज्ज असे अत्याधुनिक स्टेडियम उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रांरभी डॉ. अतुल भोसले व मान्यवरांच्या शुभ हस्ते वाखाण रोड येथे रस्ते विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खेळाडूंच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यानंतर स्व. वेणुताई चव्हाण स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ना. फडणवीस यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला.
ना. फडणवीस पुढे म्हणाले, डॉ. अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला स्टेडियमचा विकास आराखडा अतिशय सुरेख असून, कराडच्या क्रीडा वैभवात भर घालणारा आहे. त्यामुळे आमच्या सरकारने तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच कराड शहरातील वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्याच्या विकास प्रकल्पाच्या कामालाही लवकरच प्रारंभ होणार असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे कराडच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडमध्ये चांगळे खेळाडू घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आसपासच्या जिल्ह्यात कुठेही नसेल असे सर्व सुविधांनी उपयुक्त असे हे स्टेडियम आपल्याला घडवायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नुतनीकरणाची सुरवात म्हणजे क्रिडानगरी म्हणून कराडची नवी ओळख निर्माण करण्याचे पहिले पाऊल आहे. जाधव कुटुंब व ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील साहेबांच्या दूरदृष्टीमुळे १९७२ साली स्टेडियमची उभारणी झाली. पण त्यानंतरच्या जवळपास ५२ वर्षात या स्टेडियमसाठी इतका मोठा निधी उपलब्ध झाला नाही. या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करुन, ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्यासारखे खेळाडू या मातीत पुन्हा तयार करण्याचे माझे स्वप्न आहे. तसेच कराडमध्ये भविष्यात आय.पी.एल.ची मॅच घडवून आणण्याचेही माझे ध्येय्य आहे.
यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील काटकर, माजी आमदार आनंदराव पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक विनायक पावसकर, सौ. विद्या पावसकर, माधवराव पवार, माजी उपनगराध्यक्ष सुभाष जाधव, जनशक्ती आघाडीचे नेते अरुण जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, राजेंद्र माने, महादेव पवार, रणजीत पाटील, राजू मुल्ला, शिवसेनेचे नेते राजेंद्र माने, सुलोचना पवार, रमेश मोहिते, डॉ. सारिका गावडे, स्वाती पिसाळ, उमेश शिंदे यांच्यासह मान्यवर, खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिषेक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सुहास जगताप यांनी प्रास्तविक केले. अतुल पाटील यांनी आभार मानले.
चौकट
खेळाडूंना दिला बहुमान..
कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नुतनीकरणाचे भूमीपूजन करण्याचा बहुमान डॉ. अतुल भोसले यांनी खेळाडूंना दिला. या स्टेडियमसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून आणण्यामध्ये खेळाडू व कराडकरांचे मोठे श्रेय आहे. त्यामुळे या स्टेडियमच्या नुतनीकरणाचे भूमिपूजन खेळाडूंच्याच हस्ते व्हायला हवी, अशी ठाम भूमिका घेत डॉ. भोसलेंनी त्यांना बहुमान मिळवून दिला. डॉ. अतुल भोसलेंच्या या कृतीचे सर्वांनीच कौतुक केले.
फोटो ओळी :
कराड :
Comments
Post a Comment