अविनाश मोहितेंची ताकद आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी*
रेठरे बुद्रुक येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार
*कराड*: रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. अविनाश मोहिते यांची कराड दक्षिणमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिल्यामुळे आ. पृथ्वीराज यांचा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजय सुकर झाला आहे.
अविनाश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी हा घटक पक्ष बरोबरीने काम करत आहे. या पक्षात अविनाश मोहिते यांच्याकडे प्रदेश स्तरावरील जबाबदारी आहे. गेल्या महिन्यात खा. शरद पवार हे रेठरे बुद्रुक येथे अविनाश मोहिते यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीमध्ये श्री. मोहिते यांनी कृष्णा कारखान्याचे संस्थापक आबासाहेब मोहिते यांचे आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध असणारे जुने छायाचित्र खा. पवार यांना भेट दिले. या भेटीमुळे अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे कराड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.
अशाच पद्धतीने काल श्री. मोहिते यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, अविनाश मोहिते, जगन्नाथ मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, जयेश मोहिते, शिवराज मोहिते, अजितराव पाटील - चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे - पाटील, डॉ. अजित देसाई, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर्व माजी संचालक तसेच संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. विदर्भ व मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. कराड दक्षिणमध्ये खऱ्या अर्थाने विचारांची लढाई आहे. यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण व आबासाहेब मोहिते हे विशिष्ट विचाराने लढले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचा मूलभूत विचार कधी सोडला नाही. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामुळे या विभागात सहकार चळवळ उभी राहिली. परंतु विभागातील सहकारी संस्थांचे जाळे वेगळीच लोक घेवून त्यांनी राजकीय सत्तेकरिता ही केंद्रे आर्थिक सत्ता बनविण्याचे समीकरण महत्वाचे मानली आहे. ही प्रवृत्ती आपल्याला इथेच थांबवली पाहिजे.
ते म्हणाले, गेली दहा वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सर्वांना खूप त्रास झाला. व विकासकामे करण्यातही त्यांनी अडवणूक केली. राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. व कराड दक्षिणमधील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जाणार आहे.
बंडानाना जगताप म्हणाले, रेठऱ्याच्या कृष्णा नदीवरील जुना पुल कृष्णा कारखान्याची सत्ता असूनही त्यांना दुरुस्त करता आला नाही. पृथ्वीराज बाबांनी गटतट न बघता जुना पुल दुरुस्त करत नवीन पुलासाठी निधी आणला आहे. विधानसभेची निवडणूक हा विरोधकांचा तीस दिवसाचा खेळ आहे. पृथ्वीराजबाबांनी कोणाच्याही विरोधात कोणताही अपप्रचार केलेला नाही. असे नेतृत्व जपणे गरजेचे आहे.
अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, भांडवलदार व हुकुमशाही आपण घालवूया. पृथ्वीराज चव्हाण हे नोकरी करून अमेरिकेत इंजिनिअर झाले. कृष्णाकाठच्या विरोधकांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्ता व पैसा मिळवला. हा इतिहास कोणीही पुसू शकत नाही.
संतोष पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संस्थापक पॅनेल आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर आहे. डॉ. अजित देसाई यांचेही भाषण झाले. मदनराव मोहिते यांनी स्वागत केले. दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सनी मोहिते यांनी आभार मानले.
----------------------------------
*चौकट* :
बंडानाना जगताप म्हणाले, कृष्णाकाठच्या विरोधकांचा या निवडणुकीत बिमोड केल्याशिवाय पर्याय नाही. कृष्णा कारखान्याची सद्यस्थिती व कामगारांची अवस्था आपण सर्वजण डोळ्याने पाहतोय. कृष्णा कारखान्यात बिहारी कामगार आणले आहेत. व आपल्या कामगारांवर अन्याय सुरू आहे. कृष्णा आणि रयत कारखान्याच्या ऊस दरातील फरक लक्षात घ्या. रयत कृष्णापेक्षा ऊसदर देण्यात पुढे आहे.
----------------------------------
Comments
Post a Comment