राजकिय हेतू डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्या लोकांपासून सावधान - आमदार बाळासाहेब पाटील.
*कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
निवडणूक जवळ आली की अनेक लोक जागे होतात व न केलेल्या कामांचा डांगोरा पिटत असतात, अनेक खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे, असे प्रकार राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन कराड उत्तर मतदारसंघात गेली अनेक वर्षे सुरू आहेत, असा राजकिय हेतू डोळ्यासमोर काम करणाऱ्या लोकांपासून सावध राहा असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.*
ते पाल ता.कराड येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराजदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना शासनाने जाहीर केल्या आहेत, आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही, परंतु आपण कर रुपाने भरलेला पैसा हा आपल्यालाच परत दिला जातोय व त्याच्यावर राजकारण केलं जात आहे, लोकांची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. 2014 साली आपल्या मतदारसंघात दीडशे कोटी रुपयांची विकास कामांची यात्रा निघाली, काही ठिकाणी काम होणार म्हणून नारळ फोडले परंतु प्रत्यक्षात कामे झाली नाहीत त्यानंतर मी त्या कामांना निधी उपलब्ध करून ती कामे मार्गी लावली. आणि आत्ताही अशाच प्रकारचे काम मतदारसंघात सुरू आहे.
सुनील माने म्हणाले की, राजकारणात अनेक विचार असतात विचाराची लढाई विचारांनी झाली पाहिजे काही स्वयंघोषित पुढारि राजकारणामध्ये पातळी सोडून बोलत आहेत त्यांचा इतिहास भूगोल संपूर्ण मतदारसंघाला माहित आहे, वेळ आल्यास आमदार साहेबांनी केलेल्या विकासाचे पुरावे घेऊन तुम्हीच सांगाल त्या ठिकाणी आमने सामने येऊ असे खुले आव्हान जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी विरोधकांना दिले.
देवराजदादा पाटील म्हणाले, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विधायक विकास कामे मार्गी लागली, परंतु काही लोक निवडणूक जवळ आली की मतदार संघामध्ये कामे केल्याचा आव आणतात व बॅनर बाजी करून फुकटचे श्रेय घेऊन दिशाभूल करतात, पाल गावामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली त्याचेच बोर्ड आम्ही लावले, फुकटचे श्रेय घेतले नाही आणि घेणारही नाही.
शहाजीराव क्षिरसागर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले की राज्यात महाविकास आघाडीची लाट आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केल्या, त्या योजनांसाठी लागणारा पैसा हा सर्वसामान जनतेकडून काराच्या रूपातून वसूल केलला पैसा आहे, त्यास आमचा कोणताही विरोध नाही, एवढ्या योजना चालू केल्या तरी सरकारला साड्या वाटण्याचे काम करावे लागत असल्याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी संचालक भास्करराव गोरे यांनी केले व आभार उद्धवराव फाळके यांनी मांडले.
याप्रसंगी भास्करराव कुंभार, डी.बी जाधव, संजय थोरात सोमनाथ जाधव, सुरेखा जाधव, विनिता जाधव, संजय कदम, विजय निकम, प्रकाश चव्हाण, चिमणराव कदम, सर्जेराव खंडाईत, मानसिंगराव पाटील, लालासाहेब पाटील, प्रताप चव्हाण, राजू पाटील, सुहास कदम, अमित पाटील यांचेसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment