कराड हा जिल्हा करणारच : आ. पृथ्वीराज चव्हाण*
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा विंग येथे शुभारंभ.
*कराड* : १९९१ साली मला तुम्ही आशीर्वाद दिला. पहिल्यांदा मी नवखा म्हणून तुमच्यासमोर आलो. आणि तुम्ही मला पदरात घेतल्याने माझी खासदार म्हणून सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षात मोठा मान मिळाला. आणि मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सेवेत आलो. मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणेचा सर्वांगीण विकास केला. कराड जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी सर्व सोयी उभ्या केल्या. गेल्या दहा वर्षात अस्थिर व भाजपचे सरकार असल्याने मर्यादा होत्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कराड हा जिल्हा करणारच, असा ठाम विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
विंग (ता. कराड) येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व घटक पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, अॅड उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अविनाश मोहिते, आदिराज पाटील - उंडाळकर, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, नितीन काशीद, शशिराज करपे, मनोहर शिंदे, आप्पासाहेब गरुड, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, पैलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे - पाटील, शंकरराव खबाले, प्रदीप पाटील, राजेंद्र चव्हाण, अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, राज्यात भयभीत सरकार आहे. रोजगार नसल्याने लोकं हवालदील झाले आहेत. युवकांसमोर सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे. महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबना झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणमध्ये अठराशे कोटीची कामे केली. गेल्या दहा वर्षात विकासकामे करताना मर्यादा आल्या, दरम्यान च्या काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना चांगला निधी आणता आला त्यानंतर महायुती सरकार असले तरी जवळपास 1400 कोटी रुपयांची विकासकामे केली. कोणता निधी कसा आणायचा याचा मुळातच सरकारचा व प्रशासनाचा अभ्यास असल्याने जास्तीत जास्त निधी आणण्यात यश आले. येणाऱ्या काळात कराड दक्षिणेत पुन्हा तोच विकासाचा डोंगर उभा करायचा आहे कारण आता आपले महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. यापुढे कराड शहर व ग्रामीण भागातील राहणीमानाचा दर्जा कसा वाढेल, यासाठी माझा प्रयत्न आहे.
आ. चव्हाण म्हणाले, लोकसभेतील पराभवानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली याआधी कधी हि योजना सुरु करावी असं वाटलं नाही. या योजनेचे पहिल्यापासून च आम्ही स्वागत केले आहे. कारण या योजनेची सुरुवातच आमच्या कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारने केली. आम्हीही ही योजना सुरू ठेवू, व महिना दोन हजार देवू. हे करताना उपकाराची भाषा न करता महिलांचा आत्मसन्मान जपणार आहोत. यशवंतराव मोहिते आणि विलासकाका यांनी विकसित केलेल्या मतदारसंघात मी भर घातली. कराड परिसरात आयटी हब योजनेखाली कंपन्या आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा आपल्याकडे असल्याने कराड परिसरात हे स्वप्न पूर्ण करता येईल. उद्योगाचे क्षेत्र उभे करण्याचे माझे स्वप्न आहे. यातून ग्रामीण भागातील राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचा माझा प्रयत्न आहे.
आ. चव्हाण म्हणाले, कराडच्या मातीने देशाला विचार दिला. या मातीचा विचार आणि लीडरशीप जपण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. त्यासाठी भाजपचा पराभव करायचा आहे. जुन्या व्यवस्थेकडे आपल्याला जायचे का, याचाही आपल्याला विचार करायचा आहे.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, मोदी सरकारचे एजंट इथे बसले आहेत. त्यांना पराभूत करायचे आहे. पुढील वर्षी सामान्य माणसाच्या खिशातील धन वाढायचे असेल, तर महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे. शेतकऱ्यांनी निर्माण केलेले शंभर रुपये अंबानी व अदानीसारख्या पंचवीस घराण्यां च्या खिशात जातात. हे मोठे दुःख आहे. राज्यातील शेतकरी सुखी राहिला पाहिजे, याकरिता पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.
अविनाश मोहिते म्हणाले, विरोधी उमेदवाराच्या वयापेक्षा पृथ्वीराज बाबांना समाजकारणाचा अनुभव फार मोठा आहे. निवडणुकीच्या हलग्या वाजायला लागल्या की, भोसलेंचा तमाशा उभा राहतो. त्यांची कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पराभवाची हॅट्रिक करण्यासाठी सर्वांनी कंबर कसावी.
*अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले* , कराड दक्षिण मतदारसंघाने धनदांडगे व सर्वसामान्य लोकांमधील संघर्ष पाहीला आहे. विलासकाकांनी सर्वसामान्य लोकांसाठी वैचारिक संघर्ष केला. सरंजामदार लोकं जनतेला पिळून काढतील, याकरिता काकांनी संघर्ष केला.
*जयवंतराव जगताप म्हणाले,* कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे ऊसाचे बील मिळालेले नाही. रयत कारखान्यापेक्षा कृष्णा कारखान्याचा दर कमी आहे. शिवराज मोरे म्हणाले, रेठऱ्याचा पुल दुरुस्त करत नवीन पुल व प्राथमिक आरोग्य केंद्राचा विकास पृथ्वीराजबाबांनी केला.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले, विलासराव पाटील - उंडाळकर यांनी सामान्य माणसाला सत्तेत बसवले. विरोधक ज्या लोकांना रोजगार देतात. त्यांना गुलाम बनवून वापरत आहेत.
अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, भोसले कुटुंबाने काँग्रेसचा विचार गाडला. यशवंतराव मोहिते व आबासाहेब मोहिते यांच्याशी गद्दारी केली. त्यांना जनता कधीच निवडून देणार नाही. भानुदास माळी, मनोहर शिंदे, चंद्रकांत खबाले, नितीन काशीद, सुधाकर शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी अविनाश कापूरकर (रेठरे बुद्रुक), ओंकार माने (कराड) यांच्यासह अनेकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिला.
शंकरराव खबाले यांनी प्रास्ताविक केले. बाबुराव खबाले व दिपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव पाटील यांनी आभार मानले.
----------------------------------
*चौकट*
विंग येथील काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ विराट सभेस मतदारसंघातील मतदारांनी अलोट गर्दी केली होती. संयोजकांनी मतदारांना खुर्चीवर बैठक व्यवस्था केली होती. त्या खुर्च्या फुल्ल होवून हजारो मतदारांनी उभे राहून सभा ऐकली. त्यांना सभेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्क्रीन लावल्या होत्या. स्क्रीन वरील थेट प्रक्षेपण पाहत पूर्ण वेळ मतदार सभास्थळी उपस्थित होते.
---------------------------------
*फोटो ओळ*
*विंग* : येथे कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ सभेत बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समोर उपस्थित जनसमुदाय
Comments
Post a Comment