चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले
कार्वे येथे ७.४० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन उत्साहात
कराड, ता. कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
१५ : आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलेंसारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कार्वे (ता. कराड) येथे डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७.४० कोटींच्या विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महायुती सरकारच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कार्वे गावात श्री धानाई मंदिर - गोपाळनगर – शिंदे वस्ती - मोळाचा मळा ते वडगाव हवेली या रस्त्यासाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच कार्वे ते कोडोली रस्ता रूंदीकरण व मजबुतीकरणासाठी ३ कोटी आणि अल्पसंख्याक विकास योजनेतून मुस्लिम मस्जिद येथे बांधकामासाठी एकूण २० लक्ष असा एकूण ७ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, आज कृष्णा समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांना आरोग्य, शिक्षण अशा सुविधा प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक पातळीवर हे काम सुरु असतानाच; डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून आणि भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून विविध गावांमध्ये विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. येत्या काळात सरकारच्या मदतीने कराड दक्षिणचा चौफेर विकास करण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना येत्या निवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, माजी संचालक संपतराव थोरात, माजी उपसरपंच वैभव थोरात, संभाजी थोरात, माजी पं. स. सदस्य कैलास जाधव यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी :
कार्वे : महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामाचे उद्घाटन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस अन्य मान्यवर.
Comments
Post a Comment