शासकीय योजना राबविताना पक्षपातीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला वेळप्रसंगी कार्यालयात घुसून काळं फासले जाईल: सत्यजितसिंह पाटणकर*

*शासकीय योजना राबविताना  पक्षपातीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला वेळप्रसंगी कार्यालयात घुसून काळं फासले जाईल: सत्यजितसिंह पाटणकर*

पाटण दि. ७ ( प्रतिनिधी) पाटण विधानसभा मतदारसंघात कार्यरत काही वरिष्ठ , कनिष्ठ अधिकारी व त्यांच्या खालचे कर्मचारी लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी अभियान अथवा शासकीय योजना राबवताना स्थानिक राजकीय नेते, पक्ष व गटातटाचा विचार करून प्रशासकीय राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करत आहेत. नेत्यांची मर्जी सांभाळत टक्केवारी, हप्ते व भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने आपले हे उद्योग थांबवावेत अन्यथा या विरोधात निवडणूक आयोगासह प्रशासकीय वरिष्ठ विभाग, न्यायालय आदी आयुधांचा वापर केला जाईलच याशिवाय या विरोधात तीव्र आंदोलन छेडत वेळप्रसंगी शासकीय कार्यालयात घुसून त्यांच्या तोंडाला काळे फासायलाही आपण पुढेमागे पाहणार नाही असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला.     
   पाटण येथे आयोजित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.        यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निपक्षपातीपणे काम करणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक आहे. मात्र मागील काही वर्षांपासून ठराविक वरिष्ठ अधिकारी व काही कर्मचारी हे जाणीवपूर्वक नेत्यांची मर्जी सांभाळत त्यांना पूरक असे प्रशासकीय प्रयत्न करत असल्याच्या सर्वच पातळ्यांवरून मोठ्या प्रमाणावर तक्रारी व आरोप आहेत. याबाबत यापुढे कोणतीही लवचिक भूमिका न ठेवता ठोसपणे या सर्व बाबींना आपण जशाच तसे उत्तर देणार आहोत. लाडकी बहीण ही शासकीय योजना सर्वसामान्य महिला भगिनींसाठी शासनाने राबवली आहे, यात आपल्या सर्वांनीच टॅक्स तथा कराच्या माध्यमातून दिलेल्या रक्कमातूनच या भगिनींना लाभ मिळणार आहे. तो लाभ कोणत्या पक्ष अथवा नेत्याच्या खिशातून होणार नाही, तरी देखील काही अधिकारी व कर्मचारी या योजना राबवताना लाभार्थिंची तोंड बघून जर काही प्रयत्न करत असतील तर ते स्थानिक पातळीवर जागेवरच हाणून पाडले पाहिजेत. याशिवाय मतदान नोंदणी कार्यक्रमात राजकीय पक्ष, गटतट पाहून मतदान वाढ किंवा मतदार कमी करतानाही काही मंडळी संशयास्पद काम करत असल्याचेही आढळून आल्याने आपण याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार आहोत.
      यापुढच्या काळात जर कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय योजना, उपक्रम, विकासकामे अथवा निधीत जर स्थानिक नेते अथवा त्यांच्या पक्ष गटाला समर्पित होऊन प्रशासन राबवण्याचा प्रयत्न केला तर  त्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. नेत्यांसोबत असलेला त्यांचा सलोखा, टक्केवारी अथवा हप्तेखोरी, चिरीमिरीत मर्जी सांभाळणाऱ्यांनी यापुढे सावधानतेची भूमिका स्विकारावी व प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या प्रभाग, गावांना विकासासह वैयक्तिक कामं, प्रशासकीय योजना, उपक्रम कामकाजात कायदेशीर सहकार्य करावे. अन्यथा वेळप्रसंगी या विरोधात तीव्र आंदोलन आणि ठोस भूमिका घेतल्याशिवाय आपणांसह आपला कोणताही पदाधिकारी, कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, याची गंभीर दखल स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी व प्रशासन, शासनाने घ्यावी असाही इशाराही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक