पीडित महिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी 27 जून रोजी**महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन*
*महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन*
सातारा दि. 19: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता "महिला आयोग आपल्या दारी" उपक्रमाद्वारे जिल्हयातील महिलांच्या तक्रारीची स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी गुरुवार 27 जून रोजी सकाळी १० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी आयोजित केलेली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर या सुनावणीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहणार आहेत. या जनसुनावणीमध्ये ५ स्वतंत्र पॅनल्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचे समावेश करण्यात आलेला आहे. सदर पॅनल्सद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालयातील पुणे येथे सातारा जिल्ह्याच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांचेकडील प्रकरणांचे तसेच ऐनवेळी येणाऱ्या पीडित महिलांचे तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.
सातारा येथे होणाऱ्या महिला जनसुनावणीस पीडित, समस्या व तक्रारी असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी सदर सुनावणीत सहभाग घेवून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन श्री. तावरे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment