सातारा लोकसभा निवडणूक २०२४सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटीलच

सातारा लोकसभा निवडणूक २०२४

सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटीलच अस्लम मुल्ला न्युज रिपोर्टर कराड वार्ता

पवार काढणार हुकुमी एक्का, आज नाव जाहीर होणार

सातारा,(प्रतिनिधी): सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे खासदार श्रीनिवास पाटीलच असतील याच्यावर एक वाक्यता झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच लढवणार असून उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान शरद पवार आज राज्यातील लोकसभा मतदार संघापैकी त्यांच्या वाट्याला आलेल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करणार असून त्यामध्ये सातारा लोकसभेसाठीच्या रणांगणात भाजपच्या उदयनराजेंविरोधात त्यांच्या मनात हुकुमी एक्का असलेल्या श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात मागील आठवड्यात शरद पवारांचा दौरा झाला. मात्र, या दौऱ्यामध्ये सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार निश्चित होईल आणि नावही जाहीर होईल, अशी आशा लागून राहिली होती. मात्र, पवार आले आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय न घेता निघून गेले.
यावेळी शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा लढविणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, यावेळी पाटील यांनी निवडणूक लढण्यासाठी नकार दर्शवला असला तरी आठही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील यांनाच पसंती दिली होती. त्यानंतर मग दुसऱ्या नावांची चर्चा होऊ लागली.माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांची क्रमाक्रमाने नावे पुढे येत होती. 
कराड येथे नुकतीच माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीतून नाराज श्रीनिवास पाटील हे उमेदवार म्हणून उभे राहिल्यास कसे आपल्याला फलदायी ठरतील आणि महायुतीच्या उमेदवाराला कसे आव्हान देतील याची चर्चा या बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान,सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात शुक्रवारपासून वेगवान हालचाली सुरू झाल्या. खासदार श्रीनिवास पाटील हे लढणार नसल्याचे काहीअंशी खरे असले तरी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढवणार हे निश्चित आहे. कार्यकर्त्यांच्या मनातून पुढे आलेल्या नावांवर जोरदार चर्चा सुरू झाल्या. या चर्चेतून खुद्द शरद पवार यांनी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील या दोघांच्या नावावर पसंती दर्शवली. मात्र, या दोघांनी उमेदवार चाचपणी सुरू आहे. शरद पवार साहेब जो उमेदवार देतील त्याचे आम्ही निष्ठेने काम करू आणि निवडून आणू, असा आत्मविश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. सातारा लोकसभा मतदारसंघातील आठही विधानसभा मतदारसंघातील राजकीय आडाखे तपासून पाहिले, तर शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होऊ शकते असा कयास काढण्यात आला. एकूणच जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलेला असताना मात्र शरद पवारांच्या मनात त्यांचा हुकमी एक्काच घोळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या हुकमी एक्क्याची मनधरणी करण्यासाठी पवार साहेबांनी खास आदेश दिला आहे. हा आदेश दिला, की भासवला जात आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कारण महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. 

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार कोण? हा सस्पेन्स कायम राहिलेला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा यासाठीसुद्धा वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच दिल्लीहून परतलेले उदयनराजे भोसले यांनी "आरंभ हे प्रचंड" ही टॅगलाईन घेऊन शिरवळ ते राजधानी सातारा अशी ६० किलोमीटरची रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार राहतील, अशी स्थिती आहे. त्यांच्या या रॅलीवर शरद पवार यांनी टिप्पणी केली नसली तरी उदयनराजे भोसलेच हे उमेदवार असणार हे पवार जाणून आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूक लढण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगली लढत देऊ शकतील, अशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची भूमिका राहिली आहे.

ऐन निवडणुकीच्या काळामध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार आक्रमकपणे राजकीय लढा देत असताना श्रीनिवास पाटील यांनीदेखील मित्र म्हणून लढाईत शरद पवारांना साथ देण्याची पक्षातील एका गटाची भूमिका आहे. त्यासाठी हा गट त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी कामाला लागला आहे. सोमवारी नुकताच कराड येथे इंडिया आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात उपस्थित राहून श्रीनिवास पाटील यांनी मार्गदर्शन केले. शरद पवार जो उमेदवार देतील. त्याचे आपण काम करू आणि त्याला विजयी करू, अशी ग्वाही ते देत आहेत. असे जरी असले तरी पाटील यांनी लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी अखंड दौरे चालू ठेवले आहेत. या वयातही त्यांनी गाठी भेटीवर जोर दिला आहे. श्रीनिवास पाटील हे लग्न समारंभाला उपस्थित राहत असून भागातील जनतेच्या भेटी गाठी घेत आहेत.

सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नसल्याची श्रीनिवास पाटील यांची भूमिका राहिली असली तरी ते राजकारणातील चाणक्य शरद पवार यांचे खास लंगोटी मित्र आहेत आणि राजकीय जीवनामध्ये शरद पवार सांगतील तेव्हा हे सह्याद्रीसारखे कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा हा हुकमी एक्का राखून ठेवला आहे, अशी चर्चा आहे. ही पॉलिटिक्स गेम असल्याचे बोलले जात आहे आणि श्रीनिवास पाटीलच हे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहतील, खात्रीशीर माहिती समोर येत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.