श्री क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*



*श्री क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*
कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला 9021358931

*पर्यटन विकास आराखड्यात मुळ वास्तूचे सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करा* 
 *-उपमुख्यमंत्री अजित पवार*

मुंबई दि.८:- पर्यटन विकास आराखड्यामध्ये श्रीक्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मुळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभिकरणाची कामे करताना नैसर्गिक रंग वापरून, बांधकामाचे  साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्यावर भर द्यावा, या परिसराचे मूळ सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करावीत. प्रशासनाने हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात श्री क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्या बाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार मकरंद पाटील,  दूरदृश्यप्रणालीव्दारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, वित्त विभागाच्या सचिव ए.शैला, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ,  पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन या बाबी लक्षात घेवून गडावर जाणारे व येण्याचे मार्ग, बुरुज व तटबंदी  बांधकाम, किल्ल्यावर झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीची कामे, पर्यटकांसाठी सोयी सुविधा या सर्व कामांचा पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करा. किल्ल्याचे मूळ सौंदर्य कोणत्याही प्रकारे खराब दिसू नये याची खबरदारी घ्यावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाची कामे करताना या परिसरातील जैवविविधता राखली जावी. स्थानिक कृषी पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या गोष्टी लक्षात घ्या अशा सूचना त्यांनी  केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, श्रीक्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास करताना स्थानिक ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे तसेच वास्तू यांच्या रचना लक्षात घेवून नवीन कामे प्रस्तावित करा.जी कामे करणार ती गुणवत्ता पूर्ण  करून ,परिसराचे सुशोभीकरण कामासाठी पुरातन वास्तूंची रचना लक्षात घेऊन त्याच प्रकारे कामे करा.  किल्ले विकसित करण्यासाठी  वापरण्यात येणारे तंत्रज्ञान चिरकाल टिकणारे असावे याची दक्षता घ्यावी. श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये असलेली पुरातन मंदिर, नद्या आणि आजूबाजूचा परिसराची कामे करताना  स्थानिकांच्या सूचना विचारात घ्या असेही त्यांनी सांगितले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कायम टिकणारे पर्यटन विषयी कार्यक्रम राबवा. राजस्थान, केरळ  राज्याप्रमाणे पर्यटन महोत्सव राबवा. पर्यटन फेस्टिवलच्या कॅलेंडरमध्ये कांदाटी फेस्टिवलचा देखील समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतापगड किल्ल्यावर असलेली पाणीटंचाई दूर करावी. श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊन ही कामे गतीने करण्याबाबतच्या सूचना केल्या.

सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत राबवण्याच्या संभाव्य उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. या परिसराचा विकास करताना  स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
*****

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.