*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला**खेड-आळंदी मतदारसंघातील कामांचा आढावा

दि. २८ नोव्हेंबर २०२३ 
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला*
*खेड-आळंदी मतदारसंघातील कामांचा आढावा*

*तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर* 
*रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे*
*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

*चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना*

मुंबई, दि.२८: राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले.

*चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा*
चाकण शहरातील विकासकामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

हुतात्मा राजगुरू स्मारकाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहे, ती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या चाकण, राजगुरूनगर, आळंदी येथील एमआयडीसीमधून १० रस्ते जातात, यापैकी तीन रस्ते मंजूर आहेत, तर चार रस्ते एमआयडीसी क्षेत्राबाहेरील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मावळ-खेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राला जोडणारे रस्ते, पोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते बनवितानाच पर्यायी रस्त्यांची दुरूस्ती करावी, त्यांची रूंदी वाढवावी. शेतकऱ्यांची मान्यता असल्यास पुणे चक्राकार रोड (रिंग रोड) तयार करताना मरकळ ते गोलेगावदरम्यान सर्विस रोड ९० मीटरऐवजी ११० मीटर करावा. त्यापुढे तो लोणीकंदपर्यंत वाढविण्याबाबत विचार करावा. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास मान्यता देण्यात येईल.

चाकण एमआयडीसीकडे ४२ एमएलडी पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यामधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीज, गॅस, बांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबविण्यात यावेत. देशात नावीण्यपूर्ण कल्पना वापरून घनकचरा प्रकल्प उभारले जात आहेत, अशा प्रकल्पांची माहिती घेऊन यापुढील नवीन प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी राजगुरूनगर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानाला जलसंपदा विभागाची ८० गुंठे जागा देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा कृष्णा खोरे महामंडळाची असून २० लाख रूपये महामंडळाकडे भरून शासनाला जागा ताब्यात घेण्यासही मान्यता देण्यात आली.
-----०००-----

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.