कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर*



 *कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर*
माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने शासनाकडून निधी मंजूर 

 *कराड:* येथील एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि, महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एम ए डी सी ने कराड विमानतळाच्या विकास व विस्तार कामांसाठी सादर केलेल्या 221.51 कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला देण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.  पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केला तर कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी निधी मिळाला असून लवकरच एम ए डी सी कडून कामास सुरुवात होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.