-पुणे *ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या*

-पुणे 
*ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या*
 
*माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा ९ वा वर्धापन दिन कार्यक्रम* 

पुणे :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट खाली आहे, जो गरीब आहे त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारीत आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा ओबीसी मराठा धनगर समाज हे रस्त्यावर आले नसते. परंतु राज्यकर्त्यांनी त्यावेळी ऐकले नाही. बाळासाहेबांच्या विचारांची जर पूर्वीच अंमलबजावणी झाली असती तर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाली नसती, असे मत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार  रामदास कदम यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.

सन्मान सोहळ्यात कष्टक-यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी असे पुरस्कारांचे स्वरुप होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या 'क्रांतिवीर' या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशनही झाले. तसेच संस्थेच्या कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, धायरी पुणे ४१ या नवीन कॅम्पसचे भूमीपूजन झाले.

रामदास कदम म्हणाले, आजचे राजकारण अतिशय गलिच्छ झालेले आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक विचारांचे आणि सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येणे, ही समाजाची आणि काळाची गरज आहे.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केवळ शिक्षण नाही, तर आयुष्य घडविण्याचे काम होत आहे. युवा संसदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राजकारणामध्ये येऊन आपण यशस्वी होऊ शकतो, असा आत्मविश्वास संस्थेमुळे मिळत आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले, तरुणांनी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजेत. संकटाला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. सकारात्मक विचारांनी कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. मनामध्ये निराशा न आणता प्रामाणिकपणे मार्गक्रमण करत राहिलो तर यश निश्चितच मिळते. 

डॉ. बाबा आढाव म्हणाले, सनातन यांचे ओझे आपण किती वर्षापर्यंत बाळगणार आहे, असा प्रश्न मला नेहमी पडतो. नवीन विचार आणि नवीन काम हेच समाजाला नवीन दिशा दाखवून देणार आहे. त्यामुळे नवीन विचारांची प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या तरुणांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने पुरस्कार देऊन त्यांना बळ दिलेले आहे. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली तरी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आजही समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली नाहीत.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, अत्यंत दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील माझा प्रवास सुरू झाला अनेक वाईट अनुभव आले अनेकांनी अपमान केला परंतु तो अपमान सकारात्मक पद्धतीने घेऊन आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळेच आज जाधवर ग्रुप सारखी  शैक्षणिक संस्था उभी करू शकलो. विद्याधर अनास्कर, एस.के.जैन, फतेचंद रांका, संजय आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले. 

फोटो ओळ - न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात  महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देखील यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमात प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशनही झाले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.