वाटेगाव येथे रविवारी पहिले शाहीरी लोककला संमेलन

वाटेगाव येथे रविवारी पहिले शाहीरी लोककला संमेलन

महाराष्ट्रातील दिग्गज शाहीर लोककलावंतांचे सादरीकरण: जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते उदघाटन: अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती

कराड प्रतिनिधी, दि.18: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अमर शेख यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव (ता.वाळवा) येथे दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी पहिले शाहिरी लोककला संमेलन आयोजित केलेले आहे. जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उदघाटन होणार असून अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, ही माहिती संमेलनाचे निमंत्रक डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     कराड येथील पत्रकार परिषदेस रविंद्रकाका बर्डे, नवयान महाजलसाचे शाहीर सचिन माळी, ज्ञानदीप संस्था अध्यक्ष आनंदा थोरात, संतोष गोटल,  योगेश साठे उपस्थित होते. 

यावेळी डॉ.भारत पाटणकर यांनी राज्यातील या पहिल्या लोकशाहिरी, लोककला संमेलनाचे स्वरूप आणि आयोजनामागची भूमिका विशद केली.
      वाटेगाव येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत दोन सत्रात हे संमेलन होणार आहे. या शाहीरी लोककला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध तमाशा कलावंत व लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून माजी सभापती रविंद्रकाका बर्डे असणार आहेत. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे, नातू सचिन साठे, डॉ. बाबूराव गुरव, कोरो इंडिया मुंबई चे महिंद्र रोकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ.भारत पाटणकर संमेलन घेण्यामागची भूमिका मांडणार आहेत. यावेळी शाहीर शीतल साठे यांचे छक्कड गायन होणार आहे. 
      पहिल्या सत्रात लोककला, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा विषयावर मांडणी केली जाणार आहे. जयंत निकम प्रास्ताविक करणार असून धनाजी गुरव अध्यक्ष आहेत. प्रा.सचिन गरुड, पत्रकार विजय मांडके, डॉ. प्रा.शरद गायकवाड, शाहीर सचिन माळी हे प्रमुख वक्ते आहेत. दुसऱ्या सत्रात शाहिरी आणि लोककलेचे सादरीकरण होणार आहे.
 शाहीर देवानंद माळी, शाहीर सदाशिव निकम, शाहीर रणजित कांबळे, शाहीर अमर पुणेकर,शाहीर मेघानंद जाधव, शाहीर निशांत जेनू चांद, शाहीर आलम बागणीकर, शाहीर रमेश बल्लाळ, शाहीर बापू पवार, शाहीर शीतल साठे, शाहीर महादेव खंडागळे, शाहीर सचिन माळी आदी राज्यातील शाहीर सादरीकरण करणार आहेत. प्रा.गौतम काटकर सूत्र संचालन करणार असून अनिकेत मोहिते पुणे, योगेश साठे वाटेगाव हे समारोप करणार आहेत.

  डॉ.पाटणकर म्हणाले, लोककलेने सातत्याने समाजाचे प्रबोधन केलेले आहे. लोककला, लोकशाहिरी ही सामान्य, कष्टकरी आणि पिळल्या जाणाऱ्या माणसांनी जोपासली आहे. मात्र याची मुळे ज्यांच्यामध्ये आहेत, ती माणसं बाजूला फेकली जात आहेत. पूर्वीच्या जात्यावरच्या ओव्या, पेरणी करतानाची गाणी बंदच झाली. आपला माणूस आता टीव्हीला चिटकवून ठेवला आहे. मिरज, पुण्याप्रमाणे अण्णा भाऊंच्या वाटेगाव या जन्मगावी दरवर्षी राज्यातील लोकशाहीर व लोक कलावंतांचे संमेलन वाढत्या स्वरूपात व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे.

शाहीर सचिन माळी म्हणाले, नवयान महाजलसा २०१७ पासून वाटेगावला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त "शाहिरांची मानवंदना अण्णा भाऊंना" असा कार्यक्रम साजरा करीत आलेला आहे. त्यात खंड पडला केवळ एक वर्षांचा तोही कोरोना लॉकडाऊनमुळे. पण आता या उपक्रमाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. केवळ नवयान महाजलसा नाही तर अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि संस्था संघटनांनी एकत्र येऊन पहिले शाहिरी लोककला संमेलन, वाटेगाव ला घेण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. संख्यात्मक बदलातून गुणात्मक बदलांकडे हे पाऊल पडलेले आहे. तुमचीही साथ हवी आहे.

  रविंद्रकाका बर्डे म्हणाले, अण्णाभाऊ व वामनदादांनी शाहिरी टोकदार करीत तिला लोकांच्या मुक्तीचे साधन बनविले आहे. वाटेगावमध्ये राज्यातील पहिले लोकशाहिरी लोककला संमेलन होत आहे. ते अधिक नेटके आणि उठावदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.