गडचिरोलीत "शासन आपल्या दारी" या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदेजी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गडचिरोलीत "शासन आपल्या दारी" या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदेजी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानिमित्तानं अजितदादा पवार यांनी नागरिकांना संबोधित केलं.

सरकार हे जनतेसाठी असतं. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचे हेलपाटे कमी व्हावेत आणि लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महायुती सरकारचं आजचं हे कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शासनाचा पहिला महत्त्वाचा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात पार पडतोय. यावेळी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करतोय. गेली ९ वर्षे देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोदी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी काम करत आहेत. अशावेळेस केंद्र सरकार व राज्य सरकार एकाच विचाराचं असलं तर केंद्रासह राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणं सुकर होतं. त्यामुळेच आज अनेक उद्धाटनं पार पडली. ही उद्धाटनं पार पडत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शासकीय वसतिगृह आणि शासकीय निवासी वसतिगृह, निवासी शाळा इमारतीचं बांधकाम २५ कोटी रुपये खर्चून उभं करण्यात आलं. मुरमगाव येथे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचं ऑनलाइनच्या माध्यमातून उद्धाटन झालं. त्याचबरोबर साडेपाच कोटी रुपये खर्च करून ४२ खाटा क्षमता असलेल्या पीडियाट्रिक मॉड्यूलर आईसीयू तसंच कोव्हिडचा कृती आराखडा असलेल्या ५० खाटा क्षमता असणाऱ्या मॉड्युलर आईसीयू चं उद्धाटन देखील ऑनलाईनमार्फत संपन्न झालं. शेवटी हा पैसा जनतेपर्यंत, माझ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे. 

रेला नृत्य सादर करीत आदिवासी बांधवांनी आमचं स्वागत केलं. ही आपली संस्कृती आणि परंपरा आपण जपली पाहिजे. ती पुढे टिकवली पाहिजे. हाच संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात विकासाच्या अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे आपल्या राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम याठिकाणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्याला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत. यादरम्यान अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. यापूढे देखील मार्गी लावण्यात येतील. आज शासन आपल्या दारी च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा आणि शाळकरी मुलामुलींना सायकल वाटप करण्यात आलं. या लाभाचा सर्वांनी पुरेपूर उपभोग घ्यावा. 

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री याठिकाणी येतात परंतु सचिवांनी देखील गडचिरोली जिल्ह्याचे दौरे केले पाहिजेत. आठवड्याचे सगळेच दिवस चौवीस तास कामं झाली पाहिजेत. गडचिरोली येथे नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी नागपूरला न राहता गडचिरोलीमध्येच मुक्काम केल्यास या भागातील जनतेला अधिक मदत होणं शक्य होईल. प्रशासनातील रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात हे राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. गडचिरोलीमध्ये विमानतळ उभारण्याची योजना देखील आहे. जेणेकरून औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याचा विकास होऊ शकेल. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा  महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर - भंडारा - गोंदिया आणि नागपूर - गडचिरोली असा राज्य सरकारचा नियोजन आहे. याशिवाय गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विशेष आहार योजनेतून शेकडो बालकांना कुपोषणमुक्त करण्याचं काम राज्य सरकार करत आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांत २५ हजार सिंचन विहिरी बांधण्याचं काम राज्य सरकारमार्फत होत आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जवळपास ४४ हजार विहिरींची कामं हाती घेण्यात आली आहेत. वडसा देसाईगंज गडचिरोली नागपूर नागभीड या रेल्वेमार्गाची कामं विविध टप्प्यावर असून या प्रकल्पासाठी राज्यसरकारकडून आर्थिक सहभाग देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 

गडचिरोलीत पोलीस दल अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहे. कमांडोच्या भरतीत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सोयीखातर जिल्ह्यात विशेषोपचार रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. भामरागड तालुक्यात अतिवृष्टी भागांत २०० कोटींच्या पुलांच्या कामाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. यांसारख्या अनेक योजना राज्य सरकार राबवत आहे. त्यासाठी प्रशासन राबत आहे. लोकप्रतिनिधी जातीनं लक्ष देत आहेत. मात्र जनतेनं देखील पाठिंबा द्यावा. यातूनच सर्वांगीण विकास साधण्याचं काम जनतेनं केलं पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो. 

गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी राज्यातील प्रमुख नेते घेत आले आहेत. कारण याठिकाणी मुलामुलींना रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचे पोलाद कारखाने उभारण्याचं काम चालू आहे. नक्षलवादाचा समूळ उच्चाटन होऊन इथली जनता गुण्यागोविंदानं नांदावी हीच राज्य सरकारची अपेक्षा आहे. 

ज्यावेळेस कामांसाठी कोट्यवधी निधी पुरवला जातो तेव्हा ती कामं दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. याकडे गडचिरोलीमधील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदारांनी कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भगवान बिरसा मुंडा आदी सर्व महान विभूतींनी दिलेल्या विचारांतून या महाराष्ट्राला सर्वांगीणदृष्ट्या पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त