मलकापूर नगर परिषदेचे लाचखोर नगरअभियंत्यासह साथीदारास दोन दिवसाची पोलीस कोठडी
कराड
मलकापूर नगरपरिषदेचे नगरअभियंता नगरअभियंता शशिकांत सुधाकर पवार (रा. कोयना वसाहत, मूळ रा. मंद्रुळकोळे) याच्यासह खासगी इसम सुदीप एटांबे यांना 30 हजार रूपयांची लाच स्वीकारताना सोमवारी मलकापूर नगरपरिषद परिसरात ताब्यात घेतले होते. त्यांनी कराडातील रस्त्याच्या कामाच्या बिलाची उर्वरीत रक्कम देण्यासाठी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर हा सापळा लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रचला होता. मंगळवारी या दोन्ही संशयितांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली.
नगरअभियंता पवार याच्याकडे कराड नगरपरिषदेचा नगरअभियंता म्हणून तात्पुरता कार्यभार आहे. दरम्यान कराडच्या वाखाण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर या रस्त्याच्या कामाचे बिलाची उर्वरित बिल मंजुरीसाठी नगरअभियंता शशिकांत पवारने तडजोडीअंती 30 हजार रूपये मागणी करून खासगी इसम सुदीप दीपक एटांबे (रा. माऊली कॉलनी, मलकापूर) याच्याकडे देण्यास सांगितले होते. ही लाच स्वीकारताना सुदीप एटांबे व नगरअभियंता शशिकांत पवार या दोघांना मलकापूर नगरपरिषदेच्या इमारतीत अटक करण्यात आली. दरम्यान या दोघांनाही मंगळवारी दुपारी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेत पवार आणि एटांबे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पवार आणि एटांबे यांच्या अटकेने प्रशासनात खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भात चौकशीचे सत्र सुरू ठेवले होते. आणखी कोणाचे हात यात गुंतले आहेत का? याचा तपास पोलीस करत होते.
Comments
Post a Comment