पुणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या मदतीने ३ वर्षाच्या चिमुरडीची गुंतागुंतीची ह्रदयशस्त्रक्रिया यशस्वी*


*पुणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या मदतीने ३ वर्षाच्या चिमुरडीची गुंतागुंतीची ह्रदयशस्त्रक्रिया यशस्वी* 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा पुढाकार ; एम्स रुग्णालय, औंध चे मोलाचे सहकार्य

पुणे : ह्रदयाशी निगडीत असलेल्या आजारांनी गंभीररित्या ग्रासलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवण्या रावते या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने जीवनदान मिळाले. अत्यंत गुंतागुंतीची असलेली ह्रदयशस्त्रक्रिया करुन एम्स रुग्णालय, औंध येथील डॉक्टरांनी देखील यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. रावते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ट्रस्ट, सामाजिक संस्था व रुग्णालयाच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया विनामूल्य झाली.
 
रावते कुटुंबिय, एम्स रुग्णालयाचे संचालक, पदाधिकारी व ट्रस्टचे विश्वस्त यांनी मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती देखील केली. यावेळी एम्स रुग्णालयाचे ह्रदय रोग सर्जन डॉ.राजेश कौशिक, रिसर्च सेंटरचे संचालक गोकुळ गायकवाड, संचालक श्री कृष्णानी, सामाजिक विभाग प्रमुख डॉ.अशोक घोणे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, राजेंद्र परदेशी, संदीप रावते, रावते कुटुंबिय, ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.राजेश कौशिक म्हणाले, शिवण्या ला ह्रदयाशी निगडीत अत्यंत गंभीर आजार झाला होता. त्यामुळे तिची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. शस्त्रक्रियेचा खर्च ६ लाख रुपयांच्या आसपास होता. शिवण्या चे वडिल मजुरी करीत असल्याने एवढी मोठी रक्कम जमा करणे त्यांना शक्य नव्हते. तरी देखील ट्रस्टच्या मदतीने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आम्ही ही शस्त्रक्रिया विनामूल्य करुन तिला पुर्नजन्म मिळवून देण्यात यशस्वी झालो.
 
शिवण्याचे वडिल संदीप रावते म्हणाले, आमच्याकडे पैसे नसल्याने शस्त्रक्रिया कोठेच होत नव्हती. तसेच शस्त्रक्रियेला ९० टक्के धोका असल्याचेही अनेक रुग्णालयांत सांगण्यात आले. मात्र, दगडूशेठ गणपती ट्रस्टने याकाळात आम्हाला मानसिक आधार दिला. तसेच एम्स रुग्णालयाशी संपर्क करुन ही शस्त्रक्रिया विनामूल्य करुन देत, शिवण्याला जीवनदान मिळाले. त्यामुळे आम्ही ट्रस्टचे शतश: ॠणी आहोत.
 
सुनिल रासने म्हणाले, जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून ससून रुग्णालयात दररोज भोजनसेवा विनामूल्य दिली जाते. तसेच गरजू रुग्णांना विविध शासकीय व इतर योजनांची माहिती देऊन विनामूल्य उपचार व्हावेत, यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. दर महिन्याला भरविण्यात येणा-या आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून देखील अनेकांचे उपचार विनामूल्य केले जात आहेत. शिवण्या सारख्या गरजू रुग्णांना मदतीचा हात देऊन रुग्णसेवेचे कार्य करण्यास ट्रस्ट नेहमी तत्पर असेल.

*फोटो ओळ : ह्रदयाशी निगडीत असलेल्या आजारांनी गंभीररित्या वेढलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवण्या रावते या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने जीवनदान मिळाले. अत्यंत गुंतागुंतीची असलेली ह्रदयशस्त्रक्रिया करुन एम्स रुग्णालय, औंध येथील डॉक्टरांनी देखील यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. यावेळी मंदिरात दर्शन व आरतीकरिता उपस्थित रावते कुटुंबिय आणि डॉक्टर्सची टिम.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक