माझी वसुंधरा अभियानात कराड राज्यात पहिलेसलग दुसऱया वर्षी प्रथम; पाच कोटींचे बक्षीस
माझी वसुंधरा अभियानात कराड राज्यात पहिले
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱया माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये कराड नगरपालिकेने 50 ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. याबरोबरच 5 कोटी रूपयांचे बक्षीसही पटकावले आहे.
जागतिक पर्यावरण दिनी मुंबई येथे आयोजित केलेल्या सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हे बक्षीस पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपमुख्याधिकारी विशाखा पवार, मुदस्सर नदाफ, आशिष रोकडे, अनिल गवळी, किरण कांबळे, कृष्णत कांबळे, स्वच्छतादूत अजित शिंदे आदींनी स्वीकारले. नगरपालिकेने गतवेळी अभियान 2.0 मध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले होते. तर त्यापूर्वी अभियान 1.0 मध्ये दुसऱया क्रमांकाचे बक्षीस मिळवले होते. सलग तीन वर्षे या अभियानात पालिकेने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या तीन वर्षात सलग बक्षिसे मिळाल्याने पालिकेला सुमारे 13 कोटी रूपये मिळाले आहेत.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियानाचे आयोजन दरवर्षी शासनातर्फे करण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या वर्षापासून या स्पर्धेत पालिकेने अव्वल कामगिरी केली आहे. आज या पुरस्काराची घोषणा होताच नगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱयांनी जल्लोष केला. नागरिकांनीही पालिकेचे अभिनंदन केले.
कराडकरांचे अभिनंदन; कामगिरीत सातत्य ठेवावे
पालिकेचे नुकतीच बदली झालेले मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सहकाऱयांसह हा पूरस्कार स्वीकारला. सलग दुसऱया वर्षी प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांनी कराडकरांचे अभिनंदन केले. यापुढेही प्रथम क्रमांक मिळवण्याची कराड नगरपालिकेची तेवढी क्षमता आहे. त्यासाठी पालिकेने कामगिरीत सातत्य ठेवावे. विविध संस्था आणि नागरिकांनी सहकार्य केल्याने पालिकेला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया डाके यांनी दिली.
Comments
Post a Comment