कराडची बाजार समिती राज्यात अव्वल आणूया : आ. पृथ्वीराज चव्हाण
ओगलेवाडी येथे बाजार समिती निवडणुकीचा आभार मेळावा.
(छायाचित्र आहे)
कराड, प्रतिनिधी : सामान्य लोकांच्या ताकदीने कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अभद्र युतीचा पराभव केला. व स्वर्गीय विलासकाकांचे स्वप्न भग्न होवू दिले नाही, याचे मला मोठे समाधान आहे. कार्यकर्त्यांनी या विजयाने हुरळून जावू नये. व विजयाने उन्मत्त होवू नये. हा विजय नम्रपणे स्वीकारूया. असे सांगून बाजार समिती राज्यात प्रथम क्रमांकाची करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी माझे सहकार्य राहील. एकजुटीने बाजार समितीला राज्यात अव्वल आणूया. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
ओगलेवाडी (ता. कराड) येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनलेच्या विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. पैलवान हिंदूराव जाधव अध्यक्षस्थानी होते.
उदयसिंह पाटील - उंडाळकर, माण - खटाव शुगरचे को - चेअरमन मनोज घोरपडे, वर्धन ऍग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, अजितराव पाटील - चिखलीकर, कराड पंचायत समितीचे माजी सभापती एम. जी. थोरात, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, बाबूराव धोकटे, अनिल मोहिते, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, निवासराव थोरात, नामदेव पाटील, अविनाश नलवडे, प्रतापराव देशमुख, डॉ. सुधीर जगताप, महेशकुमार जाधव, सागर शिवदास, सुदाम दिक्षीत, दिपक लिमकर यांच्यासह कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, विलासकाकांच्या पश्चात त्यांच्या वारसाला पुढे नेण्याचे आश्वासन जिल्ह्यातील नेत्यांनी दिले होते. परंतु त्यांना याचा विसर पडला. याची खंत वाटते. काहींचा सगळ्याच सत्ता माझ्या ताब्यात पाहिजेत, असा दुराग्रह समोर आला. त्यातून बाजार समिती राजकारणाचा अड्डा होण्याची शक्यता होती. ते मतदारांनी होवू दिले नाही. नवनिर्वाचित संचालकांना आदर्श बाजार समिती करण्याचे आव्हान आहे. यासाठी माझे सहकार्य राहील. शासनाच्या योजना खेचून आणा.
ते म्हणाले, चुकीचे वागलो तर समाज माफ करणार नाही. हे या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले. समाजाचे हित मनात ठेवून काम केल्यास तुम्ही पुढे जाल. वाकडे पाऊल टाकल्यास समाज बाजूला करतो.
उदयसिंह पाटील म्हणाले, सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रापर्यंत नेण्याचे तत्व विलासकाकांचे होते. हेच तत्व कालच्या निवडणुकीत रयत पॅनेलचा गाभा होता. रयत पॅनेलमध्ये समविचारी लोक एकत्र आले आहेत. त्यांचे ऐक्य अबाधित राहिल्यास तुमच्या मनातील गोष्टी घडतील. व परिवर्तन तुम्हीच कराल.
मनोज घोरपडे म्हणाले, चांगला कारभार करून बाजार समिती देशात अग्रगण्य ठेवावी. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे कराड उत्तरमधील सर्व संस्थात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. धैर्यशील कदम म्हणाले, शासनाच्या माध्यमातून बाजार समितीला मिळणारी सर्व मदत मिळवून देवू. कराड बाजार समितीची निवडणूक ही परिवर्तनाची नांदी आहे.
धैर्यशील कदम म्हणाले, कराड उत्तरमध्ये निष्क्रीय व्यक्तीला बाजूला सारण्यासाठी सर्वांनी निश्चय करूया. कराड उत्तरमध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी सर्व निवडणुकांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गटतट विसरून एकत्र येऊ या. अजितराव पाटील - चिखलीकर, संजय पिसाळ (करवडी), प्रा. अजित पवार यांची भाषणे झाली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, संचालक प्रकाश पाटील - सुपनेकर, राजेंद्र चव्हाण, सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, नितीन ढापरे, संभाजी काकडे, इंदिरा पाटील, गणपत पाटील, जे. बी. लावंड, मनूभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
विजयकुमार कदम यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव पाटील - पोतलेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
-------------------
Comments
Post a Comment