सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
*गणेश गीतेत ब्रह्मापासून ते परब्रह्मा पर्यंतचा प्रवास*
*विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री : श्रीमद् गणेश गीता निरुपण सोहळ्याचे उद्घाटन*
*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; सर्वांना विनामूल्य प्रवेश*
पुणे : कोणतेही पुराण किंवा ग्रंथ आपण जेवढ्या जास्त वेळा वाचतो, तितक्या वेळा त्यातून वेगळा अर्थ आपल्याला समजतो. त्या पुराणाचा अर्थ समजून घेण्याइतके आपण विकसित होता असतो. गणेश गीता हा गणेश पुराणाचा भाग आहे. ब्रह्मापासून ते परब्रह्मा पर्यंतचा प्रवास यामाध्यमातून आपल्याला अनुभवायचा आहे, असे विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्रीमद् गणेश गीता निरुपण सोहळ्याचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेमध्ये करण्यात आले आहे. सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, श्री देवदेवेश्वर संस्थानचे रमेश भागवत, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांसह ट्रस्ट आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वानंद पुंड शास्त्री म्हणाले, विचारांना आचाराची जोड असणे गरजेचे आहे. आपले विचार चांगले असतात. मात्र, त्याप्रमाणे आपली कृती होत नाही. हाच भाव गणेश गीतेतून समजून घेणे गरजेचे आहे. संसारात असंख्य दु:ख आहेत. सुख आणि दु:ख या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. कितीही मिळाले तरी आणखी पाहिजे, ही भावना प्रत्येकामध्ये असते. जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनीय आहे. त्यामुळे सुख कितीही मिळाले तरी देखील ते शाश्वत नाही, असेही त्यांनी सांगितले.
माणिक चव्हाण म्हणाले, आपल्या मनोवृत्तींचा सर्वांगीण विकास करणारा, सुख-शांती-समाधानाचा मार्ग प्रशस्त करणारा महान ग्रंथ म्हणजे श्री गणेश गीता हा आहे. त्यामुळे पुणेकरांना ही पहिली निरुपण मालिका म्हणजे पर्वणी आहे. दिनांक २० मे पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत हा निरूपण कार्यक्रम होणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. श्रीमद् गणेश गीतेच्या प्रथम अध्यायाचे निरुपण करण्यात येणार आहे.
श्रीमद् भगवद््गीतेमध्ये १८ अध्याय ७०० श्लोक आहेत. त्यावर माऊली ज्ञानदेवांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ९०३३ ओव्यांची आहे. तर, श्री गणेश गीतेमध्ये ११ अध्याय, केवळ ४१३ श्लोक आहेत. त्यावर भगवान गणेश योगींद्राचार्य महाराजांनी लिहिलेली योगेश्वरी टीका आहे ती तब्बल १००३१ ओव्यांची. यातून आपल्याला गणेश गीतेच्या अपार गूढार्थ पूर्णतेचा अंदाज येऊ शकेल. त्यामुळे श्रीमद् गणेश गीतेच्या निरुपण सोहळ्याला सर्वांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
* फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्रीमद् गणेश गीता निरुपण सोहळ्याचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेमध्ये करण्यात आले आहे. सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर. यावेळी बोलताना विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री.
Comments
Post a Comment