सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड*उद्योजकांना ताकद दिली तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील* *महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत ; महाराष्ट्रातील १११ महिलांना आटा चक्की मशिन देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार*

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
*उद्योजकांना ताकद दिली तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील* 
*महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत ; महाराष्ट्रातील १११ महिलांना आटा चक्की मशिन देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार*
                                                                                                                        
पुणे : अनेक संस्था राजकारणाचा विचार करुन कार्यक्रम करतात. आमदार, खासदार यांच्या देखील संस्था निवडणूक आली की काही कार्यक्रम घेतात. आपण परिघाच्या बाहेर जाऊन काम करायला हवे. शासनाच्या एक पाऊल पुढे जाऊन निरंजन सेवाभावी संस्थेसारख्या संस्था आज कार्यरत आहेत. त्यांना उद्योजकांकडून सीएसआर च्या माध्यमातून चांगली साथ मिळत असून उद्योजकांना ताकद दिली, तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील, असे मत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे घोले रस्त्यावरील पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १११ गरजू महिलांना आटा चक्की मशिन देण्यात आले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. पुणेचे ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नवनीत मानधनी, सचिव सीए दुर्गेश चांडक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. कंपनीच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत या उपक्रमाला सहकार्य मिळाले.
 
उदय सामंत म्हणाले, महिलांना आत्मनिर्भर करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करुन महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याची अंमलबजावणी देखील त्वरीत झाली. यामुळे महिला घराबाहेर पडून स्वत:च्या मेहनतीने पैसे मिळविण्यास उद्युक्त होतील. सामाजिक संस्थांनी देखील शासनाच्या अशा योजना व उपक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, दुष्काळी, डोंगरद-या, दुर्गम भागात जाऊन निरंजन सेवाभावी संस्थांसारख्या संस्थांचे कार्य सुरु आहे. बीड, मराठवाडा सारख्या दुष्काळी भागात सुरु असलेले मदतीचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व कुटुंबांना उभे करण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कृष्णकुमार बूब म्हणाले, शासनाचे सहकार्य मिळाले, तर महाराष्ट्रात अनेक चांगले उद्योजक तयार होतील. संस्थेने आज आटा चक्की मशिनच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला आहे. क्लिन सायन्स मार्फत आम्ही अनेक ठिकाणी अशी मदत दिली आहे. निरंजन सेवाभावी संस्थेसोबत शैक्षणिक क्षेत्रात आणि आता महिला सबलीकरण क्षेत्रात आम्ही सहकार्य करीत आहोत. त्यामुळे यापुढेही आम्ही निरंजन सेवाभावी संस्थेसोबत कार्य करु.
 
डॉ.नवनीत मानधनी म्हणाले, दोन वेळेचे जेवण मिळविण्यासाठी धडपड  करणा-या, संसाराचा गाडा स्वत:च्या खांद्यावर पेलणा-या आणि मानाने समाजात राहण्याकरिता कष्ट करण्याची तयारी असणा-या १११ गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्याकरिता आम्ही पुढाकार घेतला आहे. केवळ धान्य, पैसे किंवा वस्तुरूपी मदत न देता, त्या महिलांना स्वत: च्या पायावर उभे करण्याकरिता संस्थेने आटा चक्की मशिन देऊन त्यांना महिला उद्योजिका होण्यास प्रोत्साहन दिले आहे.
 
सीए दुर्गेश चांडक म्हणाले, शिक्षण व महिला सबलीकरण हे संस्थेच्या कार्यपद्धतीचे दोन प्रमुख उद्देश आहेत. आटा चक्की मशिनच्या माध्यमातून घरच्या घरी धान्य दळण्याचा व्यवसाय या महिलांनी करावा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करावे, हा यामागील उद्देश. आटा चक्कीचे अत्याधुनिक मशीन महाराष्ट्राच्या विविध भागातील महिलांना देत आहे. त्या महिलांना आत्मनिर्भर करून समाजामध्ये त्यांचा आदर्श निर्माण व्हावा, याकरिता हा छोटासा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या नियोजनात उपाध्यक्ष आनंद कासट, दिलीप मुंदडा यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.

* फोटो ओळ :  निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे घोले रस्त्यावरील पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १११ गरजू महिलांना आटा चक्की मशिन देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या महिला.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.