सातारा पर्यावरणास घातक ठरणाऱ्या रिसॉर्टवर कारवाई करासामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सातारा पर्यावरणास घातक ठरणाऱ्या रिसॉर्टवर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी        

व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता धोक्यात 

   सातारा,(प्रतिनिधी) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील मुनावळे गावात नुकतेच नववर्ष स्वागताच्या निमित्ताने झालेल्या जल्लोषात पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करण्यात आली असून या प्रकरणातील हुल्लडबाज पर्यटनाला पाठबळ देणाऱ्या रिसॉर्ट्सवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.   

        यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या पर्यटनाचा दुष्परिणाम आणि हुल्लडबाज पर्यटकांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणामुळे कोयनेतील निसर्ग सौंदर्याला तसेच जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे निसर्गसंपदेच्या हानीचे प्रमाण वाढले असून वन्यजीवांच्या अधिवासातही धोका निर्माण होणे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या कक्षेत पाच गावे आहेत. त्यातील मुनावळे या ठिकाणी वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट नावाच्या अनधिकृत रिसॉर्टसह अनेक बांधकामे या संवेदनशील परिसरात बेकायदेशीररित्या उभी राहिली आहेत. येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या पार्टीत या संवेदनशील परिसरात येथील सर्व रिसॉर्ट चालकांनी मोठ्या प्रमाणात ध्वनी मर्यादा ओलांडून डॉल्बीच्या दणदणाट केला. त्यामुळे येथील वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार बफर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे लेसर लाईटस्, ध्वनीक्षेपक लावण्यास प्रतिबंध असताना येथील रिसॉर्ट चालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. वास्तविक येथे असणाऱ्या बांधकामाची कोणतीही परवानगी न घेता रिसॉर्टस् उभारले आहेत. मात्र तरीही त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनातील कुणालाच याबाबतची कल्पना नसावी हे गंभीर आहे.

   शासनाच्या २०२२ च्या सुधारित परिपत्रकानुसार धरण क्षेत्रापासून ७५ मीटर च्या आत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असताना संबंधित वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट हे जलाशयापासून ५ मीटर अंतरावर उभे आहे. अशीच अनेक बेकायदेशीर बांधकामे या संवेदनशील परिसरात उभी आहेत. असे असताना मात्र प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

वाढते पर्यटन, व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील परिसरात होणारी वाढती बांधकामे, अस्वच्छता, जलप्रदूषण, ध्वनी प्रदुषण या मुळे निसर्गसंपन्न कोयनेतील जैवविविधता धोक्यात आली आहे.

कोयना जलाशय महत्तम पुरपातळी रेषा निश्चित करून, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, सह्याद्रीतील जैवविविधता व कोयनेतील निसर्गसौंदर्य वाचवण्यासाठी संबंधित डॉल्बीचा दणदणाट करून वन्यजीवांना धोका निर्माण करणाऱ्या तसेच बेकायदेशीर बांधकाम करून रिसॉर्ट चालवणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई कारवाई अशी मागणी श्री. सोळवंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, नुकतेच या गंभीर प्रकरणाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क